Chairman Message


श्री. सुधीर (भैय्या) ज. जाधव

चेअरमन


     मानसिंग को-ऑप. बँकेच्या आणि या संस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित मान्यवर, संचालक, सभासद आणि उपस्थित बंधू भगिनिंनो आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो.

     गेली २ वर्षे संकटामागून संकटे येत आहेत, कोरोना सारख्या संकटाला आपण गेली २ वर्षे तोंड देत आहोत. त्यातच यावर्षी महापूर आणि अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट, या संकटात आपली काही माणसं परागंदा झाली. कौटुंबिक दुःखाच्या सागरात आर्थिक कुचंबनाही अनेकांच्या वाट्याला आली आहे. बेरोजगारी, उध्वस्थ शेती, आर्थिक मंदीचा फटका, उद्योगधंद्याची उधळलेली स्थिती, सर्वसामान्यांचा कोंडमारा अशा अखंड मालिकांचा परिणाम आपल्या सभासदांना बसला आणि त्याच्या परिणामाची झळ बँकेलाही बसली अशा कठोर परिस्थितीतही सभासदांनी आपली बँक म्हणून जी सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल मनापासून आभार मानतो.

     अशा या बिकट काळातही आम्हा सर्वांना एक योद्धा म्हणून संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक, आधरस्तंभ म्हणून आदरणीय जे. के. बापूंचा उल्लेख केल्याशिवाय आम्हांस पुढे जाता येणार नाही. आलेल्या परिस्थितीच्या पहाडात आपल्या विचारांचं कर्तृत्वाचं लेणं खोदत राहणाऱ्या आणि शेती, शेतकरी व्यवसाय, उद्योगाची सहकार्याच्या माध्यमातून जीवन निष्ठा बाळगणारे आपले जे. के. बापू म्हणजे आमच्या संस्थेचं श्रद्धास्थान आहे.

     आज सहकारी क्षेत्र असंख्या समस्यांच्या वादळ - वाऱ्यात अडकलेलं आहे. शेतकऱ्यांना बसलेहला आर्थिक फटका आणि व्यापार उद्योग धंद्यांची फरफट परिणामी आर्थिक व्यव्हार मंदावतो आहे. कर्जफेडीस विलंब प्रसंगी थकबाकीचे वाढते परिणाम असे एक निराशजनक चित्र समोर आहे.

     अशाही अवस्थेत आपली संस्था आपली बँक प्रगतीच्या दिशेने जात आहे, याचे श्रेय सभासद, कर्मचारी, हितचिंतक यांना आहेच यापुढिल काळातही येणाऱ्या संकटांना पेलण्याचे आवाहन करुन दुर्बलांना सबळ बनविण्याचे कार्य या मानसिंग बँकेच्या माध्यमातून करीत राहण्याचा संकल्प रौप्य महोत्सवी वर्षात निश्चितपणे पार पाडण्याचे सामर्थ्य तुम्हां आम्हां लाभो ही प्रार्थना या सहकार मंदीरात करतो, आणि पुढील विषयांकडे वळतो.